Uncategorized

रतन टाटांचा आलिशान व्हिला विक्रीला; 85 लाख किंमत, पण 55 कोटींची ऑफर, जुन्या दोस्तानं दाखवला रस

Ratan Tata

रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान व्हिला ५५ कोटी रुपयांना विकला जाणार आहे. एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन यांनी खरेदीत रस दाखवला आहे, ज्यांचे बाजारमूल्य ८५ लाख रुपये आहे. व्हिला विकल्यानंतर येणारी रक्कम रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशन आणि ट्रस्टमध्ये वाटली जाईल.

मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचा एक प्रशस्त, आलिशान व्हिला विकला जाणार आहे. सेशेल्समधील सर्वात मोठं बेट असलेल्या माहेच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला व्हिला विकण्यात येणार आहे. एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन कुटुंबानं हा व्हिला खरेदी करण्यात रस दाखवला आहे. त्यासाठी ६.२ मिलियन डॉलर मोजण्याची त्यांची तयारी आहे. भारतीय चलनात हा आकडा जवळपास ५५ कोटी रुपयांच्या घरात जातो. विशेष म्हणजे या व्हिलाचं अंदाजित बाजारमूल्य केवळ ८५ लाख रुपयांच्या घरात जातं. शिवशंकर यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे शिवशंकरन यांनीच रतन टाटा यांना हा व्हिला खरेदी करण्यास मदत केली होती.

सामान्य नियमांनुसार, सेशेल्स मध्ये केवळ तिथले नागरिक संपत्ती खरेदी करु शकतात. पण टाटा यांची जागतिक स्तरावर असलेली प्रतिष्ठा पाहता त्यांना विशेष परवानगी देण्यात आली होती. १९८२ मध्ये सेशेल्स सरकारनं टाटा मोटर्सच्या योगदानाचा सन्मान करत एक खास पोस्ट तिकिटदेखील जारी केलं होतं. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात सेशेल्समधील व्हिलाचा उल्लेख आहे. त्यांनी ही मालमत्ता सिंगापूरमधील नोंद असलेल्या आरएनटी असोशिएट्सला सोपवली होती. या कंपनीनं अनेक भारतीय स्टार्ट अप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. २००४ नंतर काही कालावधीसाठी रतन टाटा यांच्या डेनिस बेटावरील संपत्तीचं व्यवस्थापन इंडियन हॉटेल्सकडून केलं जात होतं. पण सध्याच्या घडीला टाटा मोटर्स आणि ताजचा सेशेल्समध्ये कोणताही व्यवसाय नाही.

६९ वर्षांच्या शिवशंकरन यांनी टाटा यांच्यासोबतच्या मैत्रीचे किस्से अनेकदा सांगितले आहेत. ते सात वर्ष दररोज सकाळी सव्वा सात वाजता मुंबईतील बख्यावर भवनात असलेल्या टाटा यांच्या ३ बीएचके घरात जायचे. त्यांच्या सोबत पाऊण तास घालवायचे. एकदा सिंगापूरहून सेशेल्सला जाताना विमानाचं एक इंजिन बंद झाले. त्या भीतीदायक परिस्थितीत टाटा शांत होते. तर शिवशंकरन अतिशय घाबरले होते. आता आपलं काही खरं नाही, असा विचार करुन शिवशंकरन यांनी त्यांच्या मुलाला आपले महत्त्वाचे पासवर्ड ईमेल केले होते.

सेशेल्समधील व्हिला विकला गेल्यास त्यातून येणारी रक्कम रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांच्यामध्ये समसमान प्रमाणात वाटली जाईल. ही व्यवस्था १६ जून २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे. हा व्यवहार नेमका कसा होणार याबद्दल अद्याप तरी स्पष्टता नाही. कारण शिवशंकरन यांच्या विरोधात सेशेल्सच्या सर्वोच्च न्यायालयात दिवाळखोरीची कार्यवाही सुरु आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!