टॉप न्यूज़दुनियामहाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

इंदापूरच्या हाती अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा ‘निकाल’

पुणे जिल्ह्यातील बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा

  • पुणे जिल्ह्यातील बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा ही इंदापूरकरांच्या हाती असणार आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारणे आणि माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देणे, हा निर्णय अजित पवार यांच्या पथ्यावर पडणार की, नामुष्कीची वेळ येणार, हे इंदापूरकरांच्या मतांवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ८० टक्के मतदान हे इंदापूरमध्ये झाले असून, हे मतदान अजित पवार यांच्या प्रतिष्ठेचा ‘निकाल’ लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • बारामती नगर परिषदेची निवडणूक स्थगित झाल्यावर जिल्ह्यातील उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्षवेधक निवडणूक ही इंदापूर नगर परिषदेची झाली आहे. या नगर परिषदेच्या प्रचाराकडेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे प्रचाराची आणि मतदानाची जबाबदारी अजित पवार यांनी सोपविली होती. या निवडणुकीसाठी ८० टक्के मतदार हे घराबाहेर पडले. मात्र, त्या मतदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केले, यावर अजित पवार यांची जिल्ह्यातील प्रतिष्ठा ठरणार आहे.
  • गारटकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी नाकारून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली. गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांचे एकेकाळचे साथीदार भरत शहा यांना पक्षात घेऊन राजकीय खेळी केली. या राजकीय बदलांमुळे इंदापूरमधील मतदानही सर्वाधिक झाले. मागील निवडणुकीत हर्षवर्धन पाटील आणि भरत शहा एकत्र होते. प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे मित्र होते. आता सवंगडी बदलण्यात आल्याने उलटे चित्र निर्माण झाले. कृष्णा भीमा आघाडीच्या वतीने गारटकर यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही गारटकर यांना पाठिंबा दिला. एका बाजूला हर्षवर्धन पाटील, गारटकर आणि प्रवीण माने आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि भरत शहा अशी लढत या नगर परिषदेत झाली. या नगर परिषदेतील निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्ह्यातील राजकीय प्रतिष्ठा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!