९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; जिल्हा पंचायत निवडणुकीत आपची कामगिरी ठरली सर्वांत खराब

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांनाही मोठे धक्के बसले आहेत. तसेच अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करत राजकीय नशीब अजमावले, मात्र त्यांच्या पदरी पराभव पडला. विशेष म्हणजे यावेळच्या झेडपी निवडणुकीत तब्बल ९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. त्यानंतर आरजी, काँग्रेस व अपक्षांचाही समावेश असून त्यांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.
मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एक अष्ठांशपेक्षा कमी मते मिळाली तर उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. या निवडणुकीत ३८ अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. दक्षिण गोव्यात २४ तर उत्तर गोव्यात १४ अपक्षांची अनामत रक्कम जप्त झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटानेनावेली, कोलवा व बाणावलीत अनामत रक्कम गमावली. केवळ पक्षाचे नाव पुरेसे नसून स्थानिक कामगिरी, विश्वासार्हता आणि संघटनबळ महत्त्वाचे ठरत असल्याचे चित्र दिसते.
‘आप’ने या निवडणुकीत खराब कामगिरी केली. ४२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ३५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले. लाटंबार्सेत पक्षाच्या उमेदवार छाया नाईक यांना फक्त ६४ मते मिळाली. तोरसेंत केशव लाडको कांबळी यांना १२५, शिवोलीत दिओनिझिया ब्रिटो यांना १३५, कोलवाळमध्ये स्नेजाना परैरा यांना केवळ १९५ मतें प्राप्त झाली. दक्षिणेत बेतकी खांडोळा मतदारसंघात ‘आप’चे उमेदवार शौनक कामत यांना फक्त ७५ मते मिळाली. सावर्डेत उर्मीला कालेकर यांना १५८ तर सांकवाळमध्ये आलेख नाईक यांना फक्त १६२ मते मिळाली.
काँग्रेसवर एकूण ७मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावण्याची नामुष्की आली. उत्तर गोव्यात केरी, होंडा, नगरगाव, हरमल व शिवोली या ५ मतदारसंघांमध्ये तर दक्षिणेत बोरी व सावर्डे या २ मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली. बोरी मतदारसंघात प्रणोती शेटकर यांना १८३४ तर सावर्डे मतदारसंघात राजेंद्र शिरोडकर यांना फक्त ५५२ मते मिळाली.


