KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने नव्हे तर ठाकरे गटातील नेत्यानेच सेटिंग केली, आपल्याच उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले?
KDMC Election 2026

KDMC Election 2026 Uddhav Thackeray Shivsena: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सत्ताधारी पक्षातील तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अशाप्रकारे मतदानापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीसाठी धोका असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून (Kalyan Dombivli Election 2026) शिंदे सेना-भाजप महायुतीचे सर्वाधिक म्हणजे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपच्या 14 आणि शिंदे गटाच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बहुमताचा आकडा म्हणजे मॅजिक फिगर 61 इतकी आहे. परंतु, शिवसेना-भाजपने मतदानापूर्वीच 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्याने आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक राहिल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना-भाजपने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. परंतु, कल्याण डोंबिवलीत भाजप नव्हे तर ठाकरे गटातील (Thackeray Camp) काही नेत्यांनीच पडद्यामागून शिंदे गट-भाजपला मदत केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष तात्या माने यांनीच आपल्या पक्षाच्या अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला सांगितल्याचा आरोप एका उमेदवाराने केला आहे. (Kalyan Dombivli Mahanagarpalika Election 2026)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली पोटे यांनी यासंदर्भात एक गंभीर आरोप केला आहे. वैशाली पोटे यांनी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तात्या माने यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे. यामध्ये तात्या माने, ‘निवडणुकीतून माघार घ्या’, असे सांगताना ऐकायला येत आहे. ‘एबीपी माझा’ने या ऑडिओ क्लीपची खातरजमा केलेली नाही. परंतु, ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष तात्या माने आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी कशाप्रकारे दबाव टाकत होते, हे दिसून येत आहे. ‘पक्षाचा आदेश आहे, उमेदवारी मागे घ्या. तुम्ही वरुण सरदेसाई यांच्याशी बोलून घ्या’, असे तात्या माने या ऑडिओ क्लीपमध्ये सांगत आहे. मी तुम्हाला पक्षादेश सांगतोय, काही गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. वरुन आदेश येतात, तेव्हा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात.