Kdmc: उमेदवारांची ‘बिनविरोध निवड’ हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेचे २७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या विरोधातील उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या उमेदवारांनी रिंगणातून पळ काढला किंवा त्यांना पळ काढण्यास भाग पाडले गेले. महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि दीर्घकाळानंतर त्या होत असताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी रिंगण सोडणे हे धक्कादायक व लोकशाही प्रक्रियेला पोषक नाही. ठाणे व कल्याण-डोंबिवली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गड. ठाण्यात शिंदे यांनी आपले सात उमेदवार बिनविरोध विजयी केले. कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने या महापालिकेत भाजपने आपला महापौर बसवला तर आश्चर्य वाटायला नको.
ठाणे, कल्याण-डोंबिवली या दोन्ही ठिकाणी युती करायची की, स्वबळावर लढायचे यावरून भाजप-शिंदेसेनेत बरीच खडाखडी सुरू होती. डोंबिवलीतील शिंदेसेनेचे चार नगरसेवक भाजपने गळाला लावले आणि वाद दिल्लीपर्यंत गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी युती करण्याचे आदेश दिले. वाटाघाटीत ठाण्यात भाजपला जेमतेम ४० जागा शिंदेसेनेने दिल्या. त्यातही नऊ जागा या कळवा-मुंब्रा येथील आहेत. येथे भाजप कमकुवत आहे. डोंबिवलीतील फोडाफोडीचा जणू शिंदेसेनेनी वचपा काढला, असे म्हटले तर गैरलागू ठरणार नाही. मात्र, कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खा. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ. यातील अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांत भाजपने आपले नगराध्यक्ष बसवून श्रीकांत यांना हिसका दाखवला. पाठोपाठ डोंबिवलीत १४ नगरसेवक बिनविरोध विजयी करून भाजपने आपली ताकद दाखवून दिली. याच वेगाने भाजपने कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर परिसरात हातपाय पसरले तर भविष्यातील लोकसभा निवडणुकीकरिता श्रीकांत यांना भाजपच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागेल.
बंडखोर हे मित्रांवर चालवलेले हत्यार?
कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश बंडखोरांना खाली बसवण्यात भाजप-शिंदेसेनेला यश आले आहे. दोन्ही पक्षांतील जे १२ ते १३ बंडखोर ठाण्यात आणि जवळपास तेवढेच कल्याण-डोंबिवलीत रिंगणात आहेत, त्यांना या पक्षाच्या नेत्यांचीच फूस आहे, असा संशय घ्यायला वाव आहे. महापौर कुणाचा बसणार, यावरून भाजप-शिंदेसेनेत चुरस आहे. कदाचित आपल्या बंडखोराला रसद पुरवून विजयी करायचे आणि मित्रपक्षाच्या उमेदवाराला धूळ चारून महापौरपद काबीज करायचे या डावपेचांचा हा भाग आहे. विरोधकांनी लढाईपूर्वीच मैदान सोडल्यासारखी परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष आपापसात लढणार आणि सत्ता मिळवणार, असेच संकेत आहेत.

